क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

                                                क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले    


जन्मतारीख: ३ जानेवारी, १८३१

जन्मस्थळ: नायगाव

मृत्यूची तारीख: १० मार्च, १८९७

मृत्यूस्थळ: पुणे

आई: लक्ष्मीबाई नेवसे

जन्म: ३ जानेवारी, इ.स. १८३१; नायगाव, सातारा, महाराष्ट्र

पुरस्कार: क्रांतीज्योती

        सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती.

        महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे.इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

       ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल डूडल प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले.

सावित्रीबाई फुले यांची कविता...


तयास मानव म्हणावे का?

ज्ञान नाही विद्या नाही

ते घेणेची गोडी नाही

बुद्धी असुनि चालत नाही

तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही

पशूही ऐसे बोलत नाही

विचार ना आचार नाही

तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाहीत

तयांच्या खाण्यासाठीही

ना करी तो उद्योग काही

तयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाही

मदत न मिळे कोणाचीही

पर्वा न करी कशाचीही

तयास मानव म्हणावे का?

दुसऱ्यास मदत नाही

सेवा त्याग दया माया नाही

जयापाशी सदगुण नाही

तयास मानव म्हणावे का?

ज्योतिष रमल सामुद्रीकही

स्वर्ग नरकाच्या कल्पनाही

पशुत नाही त्या जो पाही

तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राही

ऐतोबा हा खात राही

पशू पक्षात ऐसे नाही

तयास मानव म्हणावे का?

पशु-पक्षी माकड माणुसही

जन्ममृत्यु सर्वा नाही

याचे ज्ञान जराही नाही

तयास मानव म्हणावे का?

Comments

  1. खूप छान माहिती सांगितली आहे.

    ReplyDelete
  2. खुप छान माहिती सांगितली आहे 👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम ब्लॉग... सुंदर लेख...

    ReplyDelete
  4. खुप छान माहिती मिळाली

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर माहिती

    ReplyDelete
  6. Great work done by Savitribai Phule really salute to her work by this post various types of information we got.

    ReplyDelete

Post a Comment